बारामती : बारामतीकरांच्या श्रद्धेचा आणि भावनेचा केंद्रबिंदू असलेला हजरत पिर चांदशाहवली बाबांचा उरूस यावर्षी एका अत्यंत दुःखद वळणावर आला आहे. महाराष्ट्राचे लाडके नेते, विकासपुरुष आणि बारामतीचे आधारस्तंभ स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी आणि दुःखाची छाया संपूर्ण बारामतीवर पसरली आहे. या दुर्दैवी परिस्थितीचे भान ठेवत, समस्त उरूस कमिटी आणि बारामतीकरांनी यावर्षीचा उरूस अत्यंत साधेपणाने आणि शांततेत साजरा करण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. उरूस म्हणजे बारामतीसाठी केवळ एक धार्मिक उत्सव नसून, तो संस्कृती, परंपरा आणि सर्वधर्मसमभावाचा मोठा सोहळा असतो. वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहिली जाते, तो हा सोहळा यंदा मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचे नियोजन होते. मात्र, अजितदादांच्या निधनाच्या बातमीने बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. ज्या दादांनी बारामतीच्या विकासासाठी आणि जनतेच्या सुखासाठी आयुष्य वेचले, त्या दादांच्या आठवणीत आज प्रत्येक बारामतीकर दुःखात बुडाला आहे. अशा कठीण प्रसंगी उत्सव साजरा करणे अयोग्य असल्याचे मानून, उरूस कमिटीने अत्यंत वेदनादायी निर्णय घेत जल्लोषाला पूर्णविराम दिला आहे.
चांदशाहवली उरूस कमिटी आणि कुस्त्या मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, यंदा उरुसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारे सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
हजऱ्या-कलगीतुरा : परंपरेने चालत आलेल्या या भव्य कार्यक्रमाला पूर्णविराम देण्यात आला आहे.
कुस्त्यांचा आखाडा : महाराष्ट्राच्या मातीतील कुस्त्यांची पंढरी मानल्या जाणाऱ्या बारामतीमधील यंदाच्या कुस्त्यांच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत.
लोकनाट्य तमाशा : मनोरंजनाचा मुख्य घटक असलेला तमाशा आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम यंदा होणार नाहीत.
हे निर्णय घेणे कमिटीसाठी सोपे नव्हते अजितदादां प्रती असलेल्या आदरापोटी हा निर्णय घेण्यात आला आहे.
समस्त उरूस कमिटीने सर्व भाविकांना आणि बारामतीकरांना विनंती केली आहे की, "आमच्या श्रद्धेचा आम्ही पूर्ण आदर करतो, पण आजच्या घडीला दादांच्या आठवणीने संपूर्ण बारामती दुःखात आहे. त्यामुळे या निर्णयाचा आदर राखून आपण सर्वांनी प्रशासनाला आणि कमिटीला सहकार्य करावे." अजितदादा पवार हे बारामतीचे केवळ नेते नव्हते, तर ते एका कुटुंबाचे प्रमुख होते. त्यांच्या जाण्याने झालेली हानी भरून न येणारी आहे. त्यामुळे हा उरूस शांततेत साजरा करून आपण दादांना श्रद्धांजली अर्पण करूया, असा सूर आज बारामतीत उमटत आहे.

Post a Comment