बारामती (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या बारामतीमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. राजकीय पकड अधिक मजबूत करण्यासाठी आणि थेट जनसामान्यांच्या मनातील इच्छा-अपेक्षा जाणून घेण्यासाठी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 'प्रभाग भेट दौरा' अर्थात 'घोंगडी बैठकां'चा धडाका सुरू केला आहे.
१ एप्रिलपासून सुरू झालेला हा दौरा ८ एप्रिल २०२६ पर्यंत चालणार असून, या उपक्रमाला बारामतीकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. राजकारणात 'संवाद' हे सर्वात मोठे शस्त्र मानले जाते. याच सूत्राचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेसने या पोटनिवडणुकीत हाय-टेक प्रचारापेक्षा 'डोअर-टू-डोअर' आणि 'कॉर्नर मीटिंग्स'वर भर दिला आहे. शहराध्यक्ष किरण इंगळे यांनी या दौऱ्याचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले असून, पक्षाच्या वतीने प्रत्येक प्रभागातील सूक्ष्म प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या दौऱ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ भाषणे नसून 'थेट संवाद' आहे. स्थानिक नागरिकांच्या समस्या, प्रलंबित नागरिकांची कामे, आरोग्य सुविधा आणि पायाभूत सोयीसुविधा यांवर या बैठकांमध्ये सविस्तर चर्चा केली जात आहे. पक्षाच्या विकासाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवणे आणि लोकांच्या मनातील भावना थेट नेतृत्वापर्यंत पोहोचवणे हा या दौऱ्याचा मूळ हेतू आहे. हा प्रभाग भेट दौरा केवळ एक राजकीय औपचारिकता नसून, पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचा यामध्ये सक्रिय सहभाग आहे. दिवंगत महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन करून, राज्याच्या उपमुख्यमंत्री ना. सुनेत्रा पवार, राज्यसभा खासदार पार्थ पवार आणि युवा नेते जय पवार यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव, शहराध्यक्ष किरण इंगळे, उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, माजी नगराध्यक्ष इम्तियाजभाई शिकीलकर, युवक अध्यक्ष अभिजीत घाडगे, विद्यार्थी अध्यक्ष मेघराज माने, आणि जनसंपर्क अधिकारी (PRO) सुरज देवकाते यांच्यासह नगर परिषदेचे गटनेते, उपगटनेते, आजी-माजी नगरसेवक आणि विविध सेलचे पदाधिकारी अहोरात्र मेहनत घेत आहेत.
दौऱ्याचा सविस्तर आराखडा आणि प्रभागनिहाय व्याप्ती
हा दौरा शहरभर पसरलेला असून प्रत्येक महत्त्वाच्या चौकात आणि वस्तीमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे :
- १ एप्रिल रोजी भैरवनाथ मंदिर तांदुळवाडी , बौद्ध विहार, राम मंदिर राम गल्ली, सावित्रीबाई फुले सभागृह पान गल्ली, परिसरात प्रभाग भेट दौऱ्याची सुरुवात होणार आहे.
- २ एप्रिल रोजी, राष्ट्रवादी भवन कसबा, मोरया नगर ओपन स्पेस गणपती मंदिर शेजारी, अवचट इस्टेट गणपती मंदिर शेजारी, अनंत फ्लावर गार्डन माऊली नगर
- ३ एप्रिल रोजी महात्मा फुले समाज मंदिर पाटस रोड, क्षेत्रीय कार्यालय टकार कॉलनी, तांदुळवाडी वेस चौक विठ्ठल मंदिर शेजारी, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर होलार समाज मंदिर
- ४ एप्रिल रोजी पिडीसी बँक जवळ सेफी वुमन शेजारी, राष्ट्रवादी शहर पक्ष कार्यालय शारदा प्रांगण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत ओपन स्पेस, बुरुड हाउसिंग सोसायटी समाज मंदिर, बौद्ध विहार सिद्धार्थनगर
- ५ एप्रिल रोजी खंडोबानगर चौक, जामदार रोड, राष्ट्रवादी भवन कसबा, माळेगाव कॉलनी दत्त मंदिर
- ७ एप्रिल रोजी महिला सोसायटी ओपन स्पेस, सूर्यनगरी ओपन स्पेस, गावठाण काळेश्वर मंदिर जळोची, देसाई इस्टेट गणपती मंदिर, श्री गणेश मंदिर कांचन नगर, रुई गाव मारुती मंदिर
- ८ एप्रिल रोजी सिद्धिविनायक मंदिर अशोक नगर, दत्त मंदिर वसंत नगर, अशोक नगर गणपती मंदिर, या ठिकाणी बारामती शहर राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने प्रभात भेट दौरा (घोंगडी बैठक) पार पडणार आहे.
ग्रामीण आणि निमशहरी भागात 'घोंगडी बैठक' हे संवादाचे अतिशय प्रभावी माध्यम मानले जाते. यामध्ये औपचारिकता कमी आणि जिव्हाळा जास्त असतो. राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा या पारंपारिक पद्धतीचा वापर करून 'ग्राऊंड कनेक्ट' निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मोठ्या सभांऐवजी छोट्या गटांत बसून लोकांशी बोलल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होत आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणूक ही केवळ एका जागेची लढाई नसून ती प्रतिष्ठेची निवडणूक मानली जात आहे. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने आखलेला हा 'प्रभाग भेट दौरा' विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे करणार आहे. ज्या पद्धतीने सर्व सेलचे पदाधिकारी एकवटले आहेत, त्यावरून पक्षाची संघटनात्मक बांधणी किती भक्कम आहे, हे दिसून येते.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : बारामती न्युज नेटवर्क - 7276067752
.jpeg)
Post a Comment