Breaking News

10/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

शेतकऱ्यांच्या अंधाराला जबाबदार कोण? बारामतीतील वीज प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे आक्रमक

बारामती : बारामती तालुक्यातील जळगाव क.प., देऊळगाव रसाळ, सायंबाचीवाडी, कारखेल, सोनवडी, उंडवडी सुपे, खराडेवाडी आणि सोनपीरवाडी या ग्रामीण भागांत गेल्या काही दिवसांपासून सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत वीजपुरवठा खंडित केला जात आहे. ऐन कामाच्या वेळी वीज जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल होत असून, या गंभीर प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना पत्र लिहून तातडीने मार्ग काढण्याची विनंती केली आहे. दूध उत्पादक शेतकरी या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय दूध उत्पादन आहे. गायी-म्हशींच्या धारा काढण्याची मुख्य वेळ ही सायंकाळची असते. मात्र, नेमक्या याच वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने अंधारात काम करणे शेतकऱ्यांसाठी त्रासाचे बनले आहे. स्वच्छतेच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने दूध काढताना प्रकाश असणे आवश्यक असते, मात्र वीज नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी महावितरणकडे या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली असून त्यांनी थेट महावितरणच्या मुख्य अभियंत्यांशी संपर्क साधला आहे. "शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामात आणि विशेषतः दूध व्यवसायात वीज हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सायंकाळी वीज खंडित झाल्यामुळे अंधारात दूध काढणे अशक्य होत असून शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या भागात सायंकाळी वीजपुरवठा खंडित करू नये आणि सुरळीत वीज सेवा पुरवावी." तसेच ग्रामीण भागातील अर्थकारण शेती आणि दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या पत्रानंतर महावितरण प्रशासन यावर काय सकारात्मक पाऊल उचलते, याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



Post a Comment

0 Comments