प्रेमविवाहानंतर पैशांसाठी छळ पतीने गाडीखाली चिरडून पत्नीचा जीव घेतला, व्हिडिओ व्हायरल
बारामती/गाणगापूर : प्रेमविवाह करून सुखाचा संसार करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुण विवाहितेचा तिच्याच पतीने आणि सासरच्या लोकांनी अत्यंत अमानुषपणे छळ करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवीन गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आणले नाहीत, या कारणावरून सायली अक्षय जाधव हिची कर्नाटक राज्यातील गाणगापूरनजीक निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी-गुणवडी येथील रिक्षाचालक अक्षय दत्तात्रय जाधव (वय २८) आणि सायली अक्षय जाधव (वय २३) यांचा काही वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस व्यवस्थित गेल्यानंतर, अक्षय आणि त्याच्या आई-वडिलांनी सायलीकडे नवीन चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावला. सायलीच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने तिने पैसे आणण्यास असमर्थता दर्शवली. याच रागातून अक्षयने आपल्या आई-वडिलांसोबत मिळून सायलीचा काटा काढण्याचा कट रचला. सायलीला संशय येऊ नये म्हणून अक्षयने तिला 'देवदर्शनाला जाऊ' असे सांगून कर्नाटक राज्यातील गाणगापूर येथे नेले. प्रवासादरम्यान गाडीतच अक्षयच्या आई-वडिलांनी सायलीशी पैशांवरून वाद घालण्यास सुरुवात केली. अफझलपूर तालुक्यातील बळूर्गी गावाजवळ गाडी आली असता, अक्षयने गाडी थांबवून सायलीवर धारदार शस्त्राने वार केले. जखमी अवस्थेत सायलीने आपला जीव वाचवण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या माळरानात धाव घेतली. मात्र, क्रूरतेची सीमा ओलांडलेल्या अक्षयने तिचा पाठलाग केला. त्याने आपल्या ताब्यातील गाडी सायलीच्या अंगावर घातली. एवढ्यावरच न थांबता, तिने हालचाल करू नये याची खात्री करण्यासाठी त्याने ३ ते ४ वेळा गाडी तिच्या अंगावरून मागे-पुढे नेली. या भीषण हल्ल्यात सायलीचा जागीच मृत्यू झाला.
हा सर्व प्रकार घडत असताना परिसरात उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी या घटनेचा व्हिडिओ चित्रित केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये आरोपी अत्यंत निर्दयीपणे गाडी चालवताना दिसत आहे. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी तपास चक्रे फिरवली आणि या क्रूर कृत्याचा पर्दाफाश झाला. कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी पती अक्षय दत्तात्रय जाधव आणि त्याच्या आई-वडिलांना अटक केली आहे. या प्रकरणात भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम ३०२, कलम ४९८-अ आणि हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे बारामती परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सायलीच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी केली आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 7276067752

Post a Comment