मुंबई : रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ चा पहिला दीक्षांत समारंभ आज मुंबईतील लोकभवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या प्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही विशेष उपस्थिती होती. पहिलाच दीक्षांत समारंभ हा राज्यातील कौशल्य विकासाच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मेहनत, जिद्द आणि स्वप्नांचा हा उत्सव असल्याच्या भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. कौशल्य विकास हा केवळ रोजगारापुरता मर्यादित नसून स्वावलंबन, आत्मविश्वास आणि कामाच्या प्रतिष्ठेशी संबंधित असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. राज्य शासन तळागाळापासून कौशल्य विकासाला चालना देत असून, पुण्यातील औंध आयटीआय हे उद्योगाभिमुख प्रशिक्षणाचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र हे देशाचे ‘Growth Engine’ असल्याचे नमूद करत, राज्याच्या प्रगतीसाठी कुशल तरुणांची गरज असल्याचे आवाहन करण्यात आले. यासाठी ‘दक्ष’ प्रकल्प, ‘महिमा’ (Maharashtra Agency for International Mobility & Advancement), तसेच ३६ नवदिशा केंद्रे यांसारख्या उपक्रमांद्वारे तरुणांना नव्या संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे सांगण्यात आले. तसेच महाराष्ट्र हे देशाचे स्टार्टअप कॅपिटल बनत असून, युनिकॉर्न कंपन्यांच्या संख्येत राज्य अग्रस्थानी असल्याचा अभिमानही व्यक्त करण्यात आला. नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘मुख्यमंत्री उद्योजकता महा फंड’ स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

0 Comments