बारामती : शहरात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई करत फरार असलेल्या संशयितास अटक केली आहे. सुमारे ६ महिन्यांपासून तो पोलिसांच्या रडारवर होता. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती हॉटेल व्यवसायात काम करत असताना आर्थिक व्यवहारात अनियमितता केल्याचा आरोप आहे. ग्राहकांच्या नावावर बनावट नोंदी करून आणि व्यवहारात फेरफार करत सुमारे ₹34 लाखांहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
गुन्हा नोंद झाल्यानंतर संबंधित व्यक्ती काही काळ लपून राहत होती. मात्र बारामती शहर पोलिसांनी तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि सततच्या पाठपुराव्याच्या मदतीने त्याचा शोध घेऊन अखेर ताब्यात घेतले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून तपास पथकाने समन्वयाने काम करत ही यशस्वी कारवाई केली.
या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, कायद्यापासून कोणीही दूर राहू शकत नाही. सध्या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधित आर्थिक व्यवहारांची अधिक चौकशी केली जात आहे.
पोलिसांनी नागरिकांनी असे आवाहन करण्यात आले की, आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहावे आणि कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ बारामती शहर पोलिसांशी संपर्क साधावा.

Post a Comment