भिगवण रोडवर झाडे कोसळली, रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प
बारामती प्रतिनिधी सुशांत सोनवणे : बारामती शहरात आज झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांची चांगलीच धावपळ उडवली. उन्हाच्या तीव्र झळांनंतर आलेल्या या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला असला, तरी पहिल्याच पावसात शहरातील अनेक ठिकाणी गंभीर समस्या निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
विशेषतः बारामती-भिगवण रोड परिसरात पावसाचा सर्वाधिक फटका बसला. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या, तर काही ठिकाणी मोठी झाडेही कोसळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
याशिवाय रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही भागांमध्ये रस्ते आणि नाले यामधील फरक ओळखणेही कठीण झाले होते. नागरिकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि पाणी निचऱ्याच्या उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात पहिल्याच जोरदार पावसात शहरातील परिस्थिती बिघडल्याने प्रशासनाच्या तयारीबाबत शंका उपस्थित होत आहेत.
नागरिकांचे म्हणणे आहे की, जर पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर आगामी काळात मुसळधार पावसादरम्यान शहरातील परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे बारामती नगरपालिकेने तात्काळ लक्ष घालून रस्त्यांवरील पाणी काढणे, पडलेली झाडे हटविणे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
काही नागरिकांनी तर स्पष्ट इशारा दिला आहे की, वारंवार अशाच समस्या निर्माण होत राहिल्या आणि प्रशासनाने दुर्लक्ष केले तर नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. शहरातील करदाते नागरिक मूलभूत सुविधांची अपेक्षा करत असताना प्रत्येक पावसात अशा समस्या उद्भवत असतील तर त्याबाबत जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
दरम्यान, संपूर्ण बारामती शहरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हवामान विभागानेही पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तविल्याने प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

Post a Comment