Top News

राष्ट्रवादी शहर पक्ष कार्यालयात महिलांसाठी 'एसटी स्मार्ट कार्ड' शिबिराचे आयोजन; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामती : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भारतातील सर्वाधिक मताधिक्याने विजयी आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती शहराच्या वतीने महिलांसाठी विशेष 'एसटी स्मार्ट कार्ड' शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना सवलतीच्या दरात एसटी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरास महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, शारदा प्रांगण येथे या शिबिराचे उद्घाटन बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर युवक अध्यक्ष अभिजीत घाडगे, जनसंपर्क अधिकारी सुरज देवकाते, विद्यार्थी अध्यक्ष मेघराज माने, उपाध्यक्ष अन्सारभाई आत्तार, सुधीर पोद्दार, शैलेश वनवे, नवनाथ अपुणे, शब्बीरभाई शेख, अश्विनी तावरे, हेमल शहा, ॲड. रमेश कोकरे, योगेश पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार तसेच युवा नेते जय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, दि. ८ मे ते रविवार, दि. १० मे २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू राहणार आहे. यामध्ये १२ वर्षांवरील प्रत्येक युवती व महिलेसाठी 'एनसीएमसी' (NCMC) स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिले जात आहे.

कायमस्वरूपी वैध कार्ड हे कार्ड काढण्यासाठी केवळ १३० रुपये शुल्क आकारले जात असून, एकदा काढलेले कार्ड कायमस्वरूपी वैध राहणार आहे. एसटी प्रवासासाठी हे कार्ड अनिवार्य करण्यात आले असून, यामुळे सवलतीच्या दराचा लाभ घेणे महिलांना सुलभ होणार आहे. कार्ड काढण्यासाठी महिलांनी स्वतः उपस्थित राहून आपले ओळखपत्र (आधार कार्ड) सोबत आणणे आवश्यक असल्याची माहिती शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांनी दिली.

शिबिर १० मे पर्यंत सुरू बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, शारदा प्रांगण येथे आयोजित हे शिबिर १० मे २०२६ पर्यंत सकाळी १० ते ६ या वेळेत सुरू राहील. सवलतीच्या दरात कायमस्वरूपी स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post