Top News

पोलिसांच्या उपस्थितीतच संशयित प्रकार? भिगवणमध्ये चर्चा रंगली

भिगवण (प्रतिनिधी) : पुणे-सोलापूर महामार्गावरील महत्त्वाचे केंद्र असलेल्या भिगवण परिसरात सध्या एका खळबळजनक चर्चेने जोर धरला आहे. ज्या ठिकाणी पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र तैनात असतात, त्याच ठिकाणापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर वेश्या व्यवसायासारखे अनैतिक प्रकार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिगवण परिसरातील काही ठराविक लॉज आणि हॉटेल्समध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून छुप्या पद्धतीने वेश्या व्यवसाय सुरू असल्याची चर्चा आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जिथे पोलिसांची नाकाबंदी असते, तिथून हाकेच्या अंतरावर हे संशयास्पद प्रकार सुरू आहेत. यामुळे "पोलिसांच्या डोळ्यादेखत हे सगळं कसं काय चालतं?" असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. या अवैध प्रकारांमुळे भिगवणमधील स्थानिक रहिवासी, विशेषतः महिला आणि कौटुंबिक वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

स्थानिकांच्या मते, रात्रीच्या वेळी या लॉज परिसरात संशयास्पद व्यक्तींची वर्दळ वाढते. यामुळे परिसरातून येण्या-जाणाऱ्या महिलांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून, कुटुंबांसोबत राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे.

पोलिसांच्या समोर हे सर्व सुरू असूनही कारवाई का होत नाही? या प्रश्नामुळे आता विविध चर्चांना ऊत आला आहे. काही नागरिकांकडून थेट पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, "अर्थपूर्ण" संबंधांमुळेच याकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या वावड्या उठत आहेत. अर्थात, याला कोणताही अधिकृत आधार नसला तरी, प्रशासनाचे मौन या अफवांना खतपाणी घालत असल्याचे चित्र आहे.

भिगवणच्या शांततेला आणि संस्कृतीला गालबोट लावणाऱ्या या प्रकारावर आता तातडीने लगाम घालण्याची गरज आहे. नागरिकांच्या प्रमुख मागण्या संबंधित लॉज आणि हॉटेल्सची तातडीने झडती घेऊन सखोल चौकशी व्हावी. गस्ती पथकाने या परिसरात अधिक कडक पाळत ठेवावी.


Post a Comment

Previous Post Next Post