बारामती (बारामती न्यूज नेटवर्क प्रतिनिधी) : विद्यानगरी, सिल्व्हर ज्युबली रुग्णालय आणि सुसज्ज प्रशासकीय इमारतींमुळे 'हायटेक' शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीत सध्या एक वेगळीच 'स्वच्छता मोहीम' चर्चेत आली आहे. बारामती नगर परिषदेच्या हद्दीत रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी सध्या पांढऱ्या शुभ्र रंगाची अत्याधुनिक 'ग्लटन' मशिन्स फिरताना दिसत आहेत. या मशीनवर 'अदार पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह' आणि 'पुणे महानगरपालिका' असे नाव मोठ्या अक्षरात लिहिलेले आहे. आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, बारामती शहराचा कर बारामतीकर भरतात, मग या स्वच्छतेच्या कामावर पुणे महानगरपालिकेचा शिक्का कसा? बारामती न्यूज नेटवर्कच्या प्रतिनिधी ने या प्रकरणाचा मुळापासून शोध घेतला असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून बारामतीच्या मुख्य रस्त्यांवर ही इलेक्ट्रिक व्हॅक्यूम मशिन्स कचरा वेचताना दिसत आहेत. या मशीनचे डिझाइन आणि कार्यक्षमता पाहून नागरिक थक्क होतात, मात्र बारकाईने पाहिले तर या मशीनवर 'पुणे महानगरपालिका' असा स्पष्ट उल्लेख आहे. जेव्हा बारामती न्यूज नेटवर्कच्या प्रतिनिधीने या मशीनवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. त्या कर्मचाऱ्याला विचारले असता त्याने सांगितले की, "आमचा मानधन आणि या मशीनची देखभाल बारामती नगर परिषद करत नाही, तर ही कंपनी (अदार पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह) करते. आता येथेच खरी गेम आहे. जर ही यंत्रणा खासगी कंपनी चालवत आहे आणि ती पुण्यातील उपक्रमाचा भाग आहे, तर बारामती नगर परिषदेच्या हद्दीत ती अधिकृतरीत्या कोणत्या करारावर काम करत आहे?
बारामती नगर परिषदेकडे स्वतःची स्वच्छता यंत्रणा आहे, घंटागाड्या आहेत आणि कोट्यवधी रुपयांचा स्वच्छतेचा ठेकाही दिलेला आहे. असे असताना पुण्यातील 'ब्रँडिंग' असलेली ही मशीनरी बारामतीत का वापरली जात आहे? याचे काही प्रमुख प्रश्न उपस्थित होत आहेत:
- करार कोणाशी? बारामती नगर परिषदेने 'अदार पूनावाला क्लीन सिटी'शी कोणताही अधिकृत सामंजस्य करार (MoU) केला आहे का?
- कुणाच्या जीवावर ब्रँडिंग? बारामतीच्या रस्त्यावर पुणे महानगरपालिकेच्या नावाने फिरणारी ही मशिन्स बारामती नगर परिषदेच्या स्वाभिमानाला धक्का लावणारी नाहीत का?
- कायदेशीर पेच: जर उद्या या मशीनचा अपघात झाला किंवा काही तांत्रिक अडचण आली, तर त्याला जबाबदार कोण? बारामती प्रशासन की पुण्याची कंपनी?
- स्थानिक रोजगाराचे काय? जर या मशीनवरचे कर्मचारी कंपनीचे आहेत, तर स्थानिक बारामतीकर कामगारांच्या रोजगारावर याचा काय परिणाम होणार?
अदार पूनावाला यांचा हा उपक्रम पुण्यात अत्यंत यशस्वी आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून हा उपक्रम चालवला जातो. पुण्यात ही यंत्रणा पुणे महानगरपालिकेला मदत म्हणून दिली गेली आहे, म्हणूनच त्यावर मनपाचा लोगो आहे. परंतु, हीच मशीनरी बारामतीत येताना त्यावरचे 'पुणे महानगरपालिका' हे नाव का हटवले गेले नाही? बारामतीला पुण्याची 'उष्टी' यंत्रणा हवी आहे की काय, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. प्रशासकीय भाषेत याला 'तांत्रिक चूक' म्हटले जाऊ शकते. बारामती नगर परिषद आपल्या कामाचे मोठे मार्केटिंग करते, मग या मशीनवर 'बारामती नगर परिषद' असे नाव का नाही? की बारामती प्रशासनाने हा स्वच्छतेचा भार आता पूर्णपणे खासगी कंपन्यांच्या खांद्यावर सोडून दिला आहे, जर कंपनी पगार देत असेल, तर नगर परिषदेचा या कामात नक्की सहभाग काय? फक्त रस्ते उपलब्ध करून देणे एवढीच नगर परिषदेची भूमिका आहे का? मग आरोग्य विभागावर खर्च होणारा सामान्य जनतेचा पैसा जातो कुठे?
बातमीचा निष्कर्ष : बारामती नगर परिषदेने यावर स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. ही मशीनरी तात्पुरती आहे, देणगी म्हणून मिळाली आहे की भाड्याने? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बारामतीच्या रस्त्यावर पुण्याच्या नावाची पाटी लावून फिरणे हे 'स्मार्ट सिटी'कडे जाणाऱ्या बारामतीला शोभते का? प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावर काय भूमिका घेतात आणि ही 'पुण्याची मशीन' बारामतीचे नाव कधी मिरवणार, असा प्रश्न आता पडलेला आहे?
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 7276067752
.jpg)
Post a Comment