बारामती : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या वेळी युवा नेते जय दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामती येथील 'राष्ट्रवादी भवन' मध्ये ही बैठक संपन्न झाली. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जय दादा पवार भावूक झाले. या बैठकीत बारामती तालुका आणि शहरातील सर्व सेलचे पदाधिकारी, बूथ कमिटी सदस्य आणि समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय दादा पवार यांनी आगामी पोटनिवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला आणि कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. "अजितदादांनी नेहमीच कार्यकर्त्यांना कुटुंबाप्रमाणे जपले आहे. त्यांच्या रक्ताचा वारसदार म्हणून मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत असेल," अशी ग्वाही जय दादा पवार यांनी यावेळी दिली.
स्वर्गीय अजित दादांच्या कार्यपद्धतीची आठवण करून देताना जय दादा पवार म्हणाले की, दादांनी विकासकामात कधीही भेदभाव केला नाही. प्रत्येक समाजघटकाचा विचार करून त्यांनी बारामतीचा कायापालट केला. त्यांचे अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. बारामतीची ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सर्वसामान्य बारामतीकरांची आणि कार्यकर्त्यांची भावना असल्याचे जय दादा पवार यांनी नमूद केले. त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, जर कोणी निवडणूक लढवणार असेल, तर त्याला बारामतीकर मतदानाच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर देतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या बैठकीला माजी राज्यमंत्री संजय बनसोडे, पक्ष निरीक्षक उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, संभाजी होळकर, तालुकाध्यक्ष संदीप बांदल, शहराध्यक्ष किरण इंगळे, बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष श्वेता नाळे, आजी-माजी नगरसेवक तसेच पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव नाना देवकाते पाटील, माळेगाव नगर पंचायतीचे गटनेते जयदीप तावरे यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment