प्रतिनिधी, सागर सूर्यवंशी, बारामती : बारामती शहरात वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आलेली सिग्नल यंत्रणा गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. 'शोभेच्या वस्तू' बनलेल्या या सिग्नलमुळे शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला असून, प्रशासनाने याच्या देखभाल-दुरुस्तीवर नक्की किती खर्च केला आणि हे सिग्नल अद्याप का सुरू झाले नाहीत, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. शहरातील भिगवण चौक, इंदापूर चौक, शिवाजी चौक, गुणवडी चौक, पेन्सिल चौक(midc) हे अत्यंत गजबजलेले आणि महत्वाचे चौक व त्या ठिकाणी हे सिग्नल बसवण्यात आले होते. आता हेच सिग्नलचे खांब केवळ सांगाड्याच्या स्वरूपात उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. हे सिग्नल लावण्यासाठी आणि त्यांच्या देखभालीसाठी नगरपालिकेकडून किंवा संबंधित विभागाकडून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, इतका खर्च करूनही जर नागरिकांना त्याचा लाभ मिळत नसेल, तर तो पैसा नक्की गेला कुठे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तांत्रिक बिघाड की नियोजनाचा अभाव, यामुळे हे सिग्नल बंद आहेत, याचे स्पष्टीकरण देण्यास प्रशासन का टाळाटाळ करत आहे. तसेच चौकातून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. सिग्नल बंद असल्याने या चौकांमध्ये सतत वाहतूक कोंडी होते. वाहनधारकांमध्ये समन्वय नसल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. सिग्नल सुरू असते तर वाहतुकीला शिस्त लागली असती, असे मत स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी व्यक्त केले आहे. "शहराचा विस्तार होत असताना वाहतूक व्यवस्था सक्षम असणे गरजेचे आहे. लाखो रुपये खर्चून जर सिग्नल बंद राहणार असतील, तर याला जबाबदार कोण? प्रशासनाने तात्काळ दुरुस्ती करून हे सिग्नल कार्यान्वित करावेत." असा प्रश्न नागरिकांनी प्रशासनाला विचारलेला आहे.
.jpg)
0 Comments