बारामती : सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल्स आणि चहा सेंटरकडून वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर केल्या जातात. मात्र, बारामतीमधील सातव चौक येथील 'निवांत कुंदा चहा' सेंटरने जाहीर केलेली एक ऑफर सध्या ग्राहकांसाठी डोकेदुखी आणि फसवणुकीची ठरत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सातव चौकातील 'निवांत कुंदा चहा' सेंटरकडून दिनांक ११, १२ आणि १३ तारखेपर्यंत एक विशेष ऑफर जाहीर करण्यात आली आहे. या ऑफरनुसार, "एक बन मस्का पाव खरेदी केल्यास, दुसरा बन मस्का पाव अवघ्या १ रुपयात" दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. ही ऑफर पाहून अनेक ग्राहकांनी या चहा सेंटरला भेट दिली, मात्र तिथे गेल्यावर ग्राहकांच्या पदरी मोठी निराशा पडली.
ऑफरच्या नावाखाली ग्राहकांना चक्क शिळा पाव दिला जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. तसेच 'बन मस्का पाव'च्या नावाखाली फक्त 'बन पाव' देऊन त्याला अत्यंत कमी प्रमाणात मस्का (बटर) लावला जात आहे. पदार्थांची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याने अनेक ग्राहक नाराज झाले आहेत. काही ग्राहकांनी तर चव आवडली नसल्यामुळे घेतलेला बन मस्का आणि चहा टेबलवर तसाच ठेवून तिथून निघून जाणे पसंत केले. या निकृष्ट दर्जाबाबत जेव्हा उपस्थित ग्राहकांनी तिथल्या कामगारांना जाब विचारला, तेव्हा कामगारांकडून ग्राहकांना अत्यंत उद्धटपणे आणि उर्मट भाषेत उत्तरे देण्यात आली.
या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी चहा सेंटरच्या मालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मालकांना दोन वेळा फोन करूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींकडे व्यवस्थापनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
ऑफरच्या नावाखाली सातव चौकातील या चहा सेंटरमध्ये ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे अन्न देणे आणि त्यांची फसवणूक करणे अत्यंत चुकीचे असून, यावर संबंधित प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आता ग्राहकांमधून केली जात आहे.
.jpg)
Post a Comment