१९ जुलै रोजी महा रक्तदान शिबिर, तर २२ जुलै रोजी ११ हजार मोफत वृक्षरोपांचे वाटप
बारामती : स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण जुलै महिना 'जनसेवा महिना' म्हणून साजरा करण्यात येत आहे. या asअंतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रविवार, दि. १९ जुलै रोजी महा रक्तदान शिबिर, तर बुधवार, दि. २२ जुलै रोजी नागरिकांना ११ हजार मोफत वृक्षरोपांचे वाटप करण्यात येणार आहे. बारामतीकरांनी या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांनी केले आहे.
रविवार, दि. १९ जुलै रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.०० या वेळेत शारदा प्रांगण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. "करू रक्तदान, वाचवू रुग्णाचे प्राण" या संदेशातून अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान द्यावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
बुधवार, दि. २२ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता शारदा प्रांगण येथे नागरिकांना विविध देशी तसेच फळझाडांची ११ हजार मोफत रोपे वितरित करण्यात येणार आहेत. "हरित बारामती, सुंदर बारामती, स्वच्छ बारामती" या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून, पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
"सुनेत्रा वहिनींच्या प्रेरणेतून आणि पार्थ, जय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समाजोपयोगी उपक्रम"
"स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले महा रक्तदान शिबिर आणि मोफत वृक्षरोप वाटप हे समाजहिताचे उपक्रम आहेत. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रेरणेतून, खासदार पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा नेते जय पवार यांच्या संकल्पनेतून हे समाजोपयोगी उपक्रम बारामतीत सातत्याने राबविले जात आहेत. बारामतीकरांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान करावे आणि पर्यावरण संवर्धनासाठी मोफत वृक्षरोपांचा लाभ घ्यावा."
— ॲड. किरण इंगळे (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बारामती)

Post a Comment