(विशेष प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक आणि अभिमानाचा ठरला आहे. युवा नेतृत्व श्री. पार्थ अजितदादा पवार यांनी आज राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेऊन आपल्या लोकसेवेच्या नव्या इनिंगला सुरुवात केली. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात आज पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात देशाचे उपराष्ट्रपती मा. श्री. सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना खासदारकीची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यात पार्थ पवार यांचे व्यक्तिमत्त्व विशेष उठून दिसत होते. त्यांनी परिधान केलेले गुलाबी जॅकेट संपूर्ण दिल्लीत आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले.
हे जॅकेट राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या 'जनसन्मान' यात्रेची आणि त्यांनी राबवलेल्या लाडकी बहीण योजनेच्या ब्रँडिंगची आठवण करून देणारे होते. वडिलांचा राजकीय वारसा आणि पक्षाची नवी ओळख (Pink Identity) पार्थ पवार यांनी आपल्या पहिल्याच संसदीय प्रवासात अभिमानाने मिरवल्याची चर्चा रंगली आहे.
पार्थ पवार यांच्या रूपाने संसदेत एक तरुण आणि अभ्यासू चेहरा गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. "पार्थ दादा संसदेत महाराष्ट्राचे आणि विशेषतः तरुणांचे प्रश्न खंबीरपणे मांडतील," असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे. या शपथविधी प्रसंगी पवार कुटुंबातील सदस्य आणि राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
"पार्थ पवार यांच्या रूपाने एक नवा आणि आश्वासक आवाज संसदेत पोहोचला आहे. ही सुरुवात एका नव्या विकासाच्या पर्वाची आहे," अशा शब्दांत राजकीय विश्लेषकांनी या घटनेचे स्वागत केले आहे.

Post a Comment