Top News

केज तालुक्यावर शोककळा: तहसीलदार राकेश गिड्डे यांचा भीषण कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

केज/बीड : आपल्या कर्तव्यदक्षतेसाठी आणि मृदू स्वभावासाठी परिचित असलेले केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा आज, गुरुवारी (९ एप्रिल) सकाळी लातूर–अंबाजोगाई महामार्गावर भीषण कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. रेणापूर फाट्याजवळ झालेल्या या अपघातामुळे महसूल विभागात आणि केज तालुक्यात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तहसीलदार राकेश गिड्डे हे आपल्या खाजगी कारने प्रवास करत होते. लातूर–अंबाजोगाई महामार्गावर रेणापूर फाट्याजवळ त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटले आणि वाहन भीषणरीत्या पलटी झाले. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा चक्काचूर झाला आणि गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी ते कारमध्ये एकटेच होते.


अपघाताची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

राकेश गिड्डे हे तरुण आणि अत्यंत कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जात होते. अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर केज तालुक्यातील जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले होते. प्रशासकीय कामात शिस्त आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण असलेल्या या अधिकाऱ्याच्या आकस्मिक निधनाने महसूल विभागाचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच बीड आणि लातूर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. गिड्डे यांच्या पश्चात त्यांचा परिवार असून, त्यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्यातून शोक व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post