Top News

शेतकऱ्यांचे साहित्य चोरणाऱ्या टोळीचा वालचंदनगर पोलिसांकडून पर्दाफाश; ३ जणांना अटक, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

भवानीनगर परिसरातून आरोपींना ताब्यात घेत उघडकीस आणले तीन गुन्हे; ट्रॅक्टर, ट्रॉली, पिकअप अन् सौर मोटार पंप जप्त

इंदापूर : पुणे ग्रामीण जिल्ह्यामधील वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेतकऱ्यांच्या साहित्याची चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ट्रॅक्टर, ट्रॉली, पिकअप आणि सौर मोटार पंप असा एकूण २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


गेल्या काही दिवसांपासून पुणे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, ट्रॉली, पिकअप, सौर मोटार पंप आणि केबल वायर चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार वालचंदनगर पोलिसांचे तपास पथक कार्यरत होते. तपासादरम्यान पोलीस अंमलदार कीर्तीलाल गायकवाड आणि गणेश वानकर यांना गुप्त बातमीदाराद्वारे बातमी मिळाली की, जयदीप नानासो घोळवे व त्याचे साथीदार भवानीनगर, लाकडी आणि शिंदेवाडी परिसरातील चोरीच्या घटनांमध्ये सहभागी आहेत.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी भवानीनगर परिसरातून संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ट्रॅक्टर, ट्रॉली, पिकअप आणि मोटार पंप चोरी केल्याची कबुली दिली. या कारवाईत जयदीप नानासो घोळवे (वय २२), मेघराज नानासो आंबासे (वय २२) आणि आकाश विलास शिंदे (वय २३, सर्व रा. निंबोडी, ता. इंदापूर, जि. पुणे) या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या कबुलीवरून पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांची उकल झाली आहे.

कारवाई दरम्यान पोलिसांनी न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर, महिंद्रा कंपनीची पिकअप, चारचाकी ट्रॉली आणि सौर मोटार पंप असा सुमारे २५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा जप्त केलेला मुद्देमाल संबंधित शेतकरी व फिर्यादींना परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस हवालदार कीर्तीलाल गायकवाड, अजित थोरात, परिमल मानेर, अजित भाग्यवंत तसेच पोलीस अंमलदार विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, अभिजीत कळसकर व राहुल माने यांच्या पथकाने केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post