Top News

२०१ बारामती विधानसभा: नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या भागातील SIR चे कामकाज सर्वात प्रथम पूर्ण; बीएलओ कर्मचाऱ्यांची कौतुकास्पद कामगिरी

बारामती (प्रतिनिधी) : विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (SIR) मोहिमेंतर्गत मतदार पडताळणी आणि डिजिटायझेशनचे आव्हानात्मक काम वेळेत आणि मुदतीपूर्वी पूर्ण करत बारामतीतील बीएलओ (BLO) कर्मचाऱ्यांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे. २०१ बारामती विधानसभा मतदारसंघातील बारामती शहरातील नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या भागातील 'विशेष सखोल मतदार पुनरीक्षण' (SIR) चे कामकाज सर्वात प्रथम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.


या मोहिमेंतर्गत बीएलओ कर्मचाऱ्यांनी पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत अहोरात्र धावपळ करत डिजिटल नोंदणीचे कठीण आव्हान फत्ते केले. प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अचूक आणि भक्कम मार्गदर्शनाखाली बीएलओ कर्मचाऱ्यांनी बारामती शहरातील SIR चे काम १००% पूर्ण करून प्रशासकीय पातळीवर उल्लेखनीय टप्पा गाठला आहे.

हे क्लिष्ट काम यशस्वी करण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मीनल कळसकर, बारामतीचे प्रांत अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार स्वप्निल रावडे, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, उपमुख्याधिकारी योगिता दरेकर आणि पर्यवेक्षक एस. पी. पिसे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन बीएलओ कर्मचाऱ्यांना लाभले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी घेतलेला आढावा, तांत्रिक अडचणींवर केलेले मार्गदर्शन आणि दिलेल्या पाठबळामुळेच बीएलओ कर्मचाऱ्यांना हे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करणे शक्य झाले.

विशेष म्हणजे भाग क्रमांक १२३ मध्ये बीएलओ श्रीमती निलम काशिद यांनी उत्कृष्ट काम पाहिले. या भागात सुतार नेट, मुंजाबा देऊळ, सातव गल्ली आणि ढवाण गल्ली या परिसराचा समावेश होता. येथील एकूण १०१३ मतदारांपैकी ८५४ फॉर्म्सचे यशस्वी डिजिटायझेशन करण्यात आले, तर १५९ मतदार अनकलेक्टेबल म्हणून मार्क करण्यात आले. हे कामकाज पूर्ण करण्यासाठी बीएलओ सुपरवायझर एस. पी. पिसे, एईआरओ योगिता दरेकर, नगराध्यक्ष सचिन सातव, बीएलए अभिजित ढवाण तसेच नगरसेवक सुरज सातव व प्रतीक ढवाण यांनी बीएलओ कर्मचाऱ्यांना विशेष सहकार्य केले.

मुदतीपूर्वी आणि अत्यंत अचूकपणे हे काम पूर्ण केल्याबद्दल बीएलओ कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. नगराध्यक्ष सचिन सातव, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार स्वप्निल रावडे, मुख्याधिकारी पंकज भुसे आणि उपमुख्याधिकारी योगिता दरेकर यांच्या हस्ते बीएलओ यांना विशेष प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post