Top News

बारामती विधानसभा पोटनिवडणूक 'बिनविरोध'ची चर्चा संपली! पहिल्याच दिवशी ३ अर्ज दाखल

बारामती (प्रतिनिधी) : स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी आणि अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले आहे. बारामतीमध्ये आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून, सर्वांचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीत 'बिनविरोध'ची चर्चा आता पूर्णपणे थांबली आहे. ३० मार्च २०२६ रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल ३ अर्ज दाखल झाल्याने बारामतीची निवडणूक आता चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी बारामती प्रशासकीय कार्यालयात ३ अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये विविध पक्षांच्या आणि अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. १. सतीश कृष्णा कदम: (हिंदुस्तान जनता पार्टी) - अनुसूचित जाती प्रवर्ग. २. सागर शरद भिसे: (अपक्ष) - अनुसूचित जाती प्रवर्ग. ३. राघू येताळ घुटूकडे: (न्यू राष्ट्रीय समाज पार्टी) - खुला गट. पहिल्याच दिवशी आलेल्या या अर्जांमुळे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा मार्ग आता कठीण दिसत आहे.
दुसरीकडे, ओबीसी नेते मा. लक्ष्मण हाके यांनी आधीच बारामतीमध्ये तळ ठोकला आहे. त्यांनी आपली जोरदार प्रचार यंत्रणा सक्रिय केली असून प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर दिला आहे. लोकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी हाके यांनी कंबर कसली आहे. हाके यांच्या सक्रियतेमुळे या निवडणुकीत ओबीसी फॅक्टर किती प्रभावी ठरणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 
सर्वात मोठी चर्चा आहे ती म्हणजे महाविकास आघाडी आणि विशेषतः काँग्रेस पक्षाची. काँग्रेसने अद्याप आपला अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. बारामती हा नेहमीच हाय-प्रोफाईल मतदारसंघ राहिला आहे, त्यामुळे काँग्रेस कोणाला मैदानात उतरवते, की काही वेगळी रणनीती आखते, याबद्दल राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.

बारामती विधानसभा मतदारसंघ निवडणुकीची तारीख :
  • अधिसूचना : 30 मार्च 2026
  • अर्जाची अंतिम तारीख : 6 एप्रिल 2026
  • छाननी : 7 एप्रिल 2026
  • माघार : 9 एप्रिल 2026
  • मतदान : 23 एप्रिल 2026
  • मतमोजणी : 4 मे 2026
बारामतीचा गड कोण राखणार? अजितदादांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी बारामतीकर कोणाला कौल देणार? स्थानिक प्रश्न, आरक्षण आणि विकास कामे यावर ही निवडणूक फिरणार की भावनिक साद घातली जाणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.



Post a Comment

Previous Post Next Post